- म्हैसूर वॉरियर्स संघातून महिला टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणार श्रेया पोटे
सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगाव तालुक्याच्या सुळगा (हिं.) गावातील उदयोन्मुख युवा क्रिकेटपटू कु. श्रेया भोमाण्णा पोटे हिची पुढील महिन्यात बेंगळूर येथे होणाऱ्या महाराणी महिला टी – ट्वेंटी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धेमध्ये म्हैसूर वॉरियर्स संघाने २०,०००/- रुपये किंमतीच्या मोबदल्यात तिला संघातून खेळण्याची संधी दिली आहे.
बालपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या श्रेयाने वयाच्या नवव्या वर्षापासून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेट कोच फिरोज शेख आणि फिटनेस कोच ओंकार मोटार यांचे मार्गदर्शन तसेच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आजवर घवघवीत यश प्राप्त केले आहे. यापूर्वी २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीत तिला कर्नाटक राज्यस्तरीय पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट संघातून खेळण्याची संधी लाभली होती.
श्रेयाचे प्राथमिक शिक्षण सुळगा (हिं.) येथे तर माध्यमिक शिक्षण महिला विद्यालय बेळगाव येथे झाले आहे. सध्या ती पीयुसी द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून बेंगळूर सिक्स स्पोर्ट्स ॲकॅडमीमध्ये कोचिंग करत आहे. या निवडीमुळे सुळगा (हिं.) गावचा नावलौकिक वाढला आहे. याबद्दल सर्वच स्तरातून श्रेयाचे अभिनंदन केले जात असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.