• लाखो रुपयांच्या अंमली पदार्थांसह दोघांना अटक
  • ‘अदिती’ श्वानामुळे कारवाईला यश

बेळगाव : अंमली पदार्थांच्या नेटवर्कविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सीसीबी पोलिसांनी सुळगा (हिं.) गावात मोठी कारवाई करत ड्रग्स विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत सुमारे २.६० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

बेळगाव तालुक्यातील सुळगा (हिं.) परिसरात भाडोत्री घरात अंमली पदार्थ साठवून विक्री सुरू असल्याची माहिती सीसीबीला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने अंमली पदार्थांची पाकिटे घरातील पलंगाखाली लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांसोबत असलेल्या ‘अदिती’ या श्वानाने आपल्या वास घेण्याच्या क्षमतेच्या जोरावर लपवलेले अंमली पदार्थ शोधून काढले आणि आरोपींची खेळी उधळून लावली.

या कारवाईत सुमारे १३ ग्रॅम स्वस्त अंमली पदार्थ आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. मुख्य आरोपी नागेश भगत (मुंबई) आणि त्याचा साथीदार राहुल जाधव यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागील इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.