बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे विनापरवाना आणि कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावल्याप्रकरणी मारीहाळ पोलिसांनी तीन जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. घटनेत वापरलेले साऊंड साहित्य तसेच एक ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, ३ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास सुळेभावी गावातील होसकेरी गल्लीत एका लग्न समारंभाच्या निमित्ताने साऊंड सिस्टीम लावण्यात आली होती. संबंधित विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. या सिस्टीममुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला तसेच आवाजाची मर्यादा ओलांडल्याने नागरिकांच्या शांततेचा भंग झाला, अशी तक्रार पोलिसांकडे नोंदवण्यात आली.
या प्रकरणी सुरेश रामप्पा बंगन्नवर (रा. सुळेभावी), वीरभद्र नागप्पा यरगुद्दी (रा. सोमनट्टी, ता. बैलहोंगल) आणि रोहित देवप्पा लक्कनगौडर (रा. सुळेभावी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांवर सार्वजनिक उपद्रव आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पोलिसांनी अंदाजे ३२,००० रुपये किमतीचे साऊंड साहित्य जप्त केले आहे. यात साऊंड बेस (किंमत १२,००० रु.), साऊंड टॉप (किंमत १०,००० रु.), कंट्रोलर मिक्सर (किंमत १०,००० रु.) आणि साऊंडसाठी वापरलेला होंडा जनरेटर यांचा समावेश आहे. तसेच या साहित्याचे वाहतुकीसाठी वापरलेला ट्रॅक्टर (क्र. KA-22 T-3566) देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मारीहाळ पोलिसांचे कर्मचारी आय. एम. शीलवंतर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्य असून, विनापरवाना ध्वनिक्षेपकांचा वापर करणाऱ्यांवर यापुढेही कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने अधोरेखित केले.







