• मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन

बेळगाव / प्रतिनिधी

सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता, पारदर्शकता आणि नवकल्पनांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून बांधकाम क्षेत्रही त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत बेळगाव क्रेडाईच्या वतीने आयोजित करण्यात आलेले बेल्कॉन प्रदर्शन अत्यंत आवश्यक आणि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या बेल्कॉन प्रदर्शनाच्या शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय पाटील, माजी आमदार महांतेश कवडगीमठ, बेळगाव शहर प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांचा क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी आणि इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंत्री सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले, बेळगावसारख्या शहरात इतक्या भव्य स्वरूपाचे बेल्कॉन प्रदर्शन आयोजित होणे ही अभिमानाची बाब आहे. शहराच्या विकासात क्रेडाईचे योगदान मोठे असून या क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार संजय पाटील यांनी, शहराच्या विकासासाठी क्रेडाईने केलेले प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद असून बेल्कॉनसारख्या प्रदर्शनातून संस्थेची कार्यक्षमता अधोरेखित होत असल्याचे सांगितले. माजी आमदार महांतेश कवडगीमठ यांनी, उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे शहर म्हणून बेळगावची ओळख असून येथील बांधकाम व्यवसायाची ख्याती राज्यभर आहे. राणी चन्नम्मांच्या भूमीत भरवण्यात आलेले बेल्कॉन प्रदर्शन प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रेडाई राज्य उपाध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष युवराज हुलजी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी इव्हेंट चेअरमन प्रशांत वाडकर यांनी आभार मानले.