बेळगाव / प्रतिनिधी

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिवंगत भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी श्रीमती लीला दाजीबा देसाई (वय 99) यांचे आज दि. 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. आज शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लीला देसाई (आक्का) दिवंगत खासदार भाई दाजिबा देसाई यांच्या सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यात नेहमी पहाडासारख्या उभ्या रहात. साराबंदीच्या सत्याग्रहात त्यांचा सहभाग लक्षणीय होता. भूमिगत कार्यकर्त्यांसाठी त्या स्वतः भोजन व इतर व्यवस्था करत. सत्यशोधक समाजाची घट्ट पकड आजही त्यांच्या मनावर होती. भाई व्ही. एस. पाटील यांच्या कन्या असणाऱ्या आक्कांचे शिक्षण बीएपर्यंत झालेलं आहे. त्यांना गुरुवर्य शामराव देसाई, मामासाहेब लाड, शाहीर बहिर्जी शिरोळकर, बहिर्जी ओऊळकर अशा अनेक सत्यशोधक व शेकाप नेत्यांचा सहवास लाभला. आक्का उत्कृष्ट चित्रकार होत्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एम्ब्रॉयडरी केलेला फोटो पाहताना नजर हटत नाही. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांचा फोटो जिवंतपणा अनुभवतो. अशी असंख्य चित्रे आक्कांनी साकारली आहेत. ज्योती कॉलेजसाठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या निधनाने समाजात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.