- जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
अलीकडेच उसाच्या दरवाढीसाठी झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान हत्तरगी टोल नाक्यानजीक झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा तपास करून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, चन्नागौडा ससालट्टी (वय ४०), प्रशांत मुगळी (वय २८), विनायक कोटीवली (वय २५), मल्लाप्पा घटगी (वय ४६), शिवानंद वाणी (वय ५९) आणि सोमय्या हिरेमठ (वय ४६) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
दि. ७ नोव्हेंबर रोजी पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी टोल नाक्याजवळ उसाचा दर ३५०० रुपये प्रति टन निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. मात्र या दरम्यान काही अनोळखी व्यक्तींनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यात १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांवर हल्ला आणि दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध यमकनमर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले की, दगडफेक करणारे व्यक्ती शेतकरी नसून, आंदोलनाचा बहाणा करून गोंधळ घालण्यासाठी आलेले बाहेरील लोक होते. यमकनमर्डी पोलिसांनी व्हिडिओ पुराव्यांच्या आधारे तपास करून सहा आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्पष्ट केले.








