बेळगाव / प्रतिनिधी
वडगावची ग्रामदेवता आणि नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीच्या यात्रोत्सवास मंगळवार पासून उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस असून त्यानंतर सुमारे आठवडाभर यात्रेची धूम राहणार आहे. यात्रेनिमित्त सुमारे महिनाभर देवीचे वार पाळण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी भरयात्रा साजरी करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी देवीचे हक्कदार, पंचमंडळी व वडगाव ग्रामस्थांच्या वतीने संवाद मिरवणुकीने वडगाव परिसरातील विविध मंदिरात जाऊन पूजन करण्यात आले. त्यानंतर देवीला घालण्यात आलेले गाऱ्हाणे उतरवण्यात आले. त्यानंतर यात्रेची सुरुवात झाली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली होती. गाऱ्हाणे उतरवल्यानंतर ओटी भरण्यासह नवस फेडण्यास सुरुवात झाली. वडगाव, जुने बेळगाव, शहापूर, अनगोळ, बेळगावसह धामणे, येळ्ळूर व विविध ठिकाणाहून आलेल्या तसेच महाराष्ट्र, गोवा राज्यातील असंख्य भाविकांनी देवीचे दर्शन घेण्यासह नवस फेडला.

यात्रेदिवशी बऱ्याच प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. तरी भाविकांचा उत्साह टिकून होता. यात्रेनिमित्त पाटील गल्ली, वडगाव येथील मंगाई देवी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तर मंदिर मार्गावर ओटी भरण्याचे साहित्य, विविध प्रकारचे स्टॉल, खेळण्याचे साहित्य, मनोरंजनाचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. ग्रामदेवतेच्या उत्सवाच्या स्वागतासाठी विविध राजकीय, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बॅ. नाथ पै. सर्कल शहापूर पासून वडगाव परिसर, नाझर कॅम्प, वाडा कंपाऊंड भागात स्वागत कमानी फलक उभारण्यात आले आहेत.