बेळगाव / प्रतिनिधी
खडेबाजार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज शुक्रवारी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आर्यन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंतराव कृष्णा मजुकर यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यानंतर बोलताना हणमंतराव मजुकर यांनी सीमाप्रश्नासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या भरीव योगदानाचा उल्लेख केला. सीमावासीयांच्या हक्कांसाठी ते नेहमी खंबीरपणे उभे राहिले असून, ते समस्त हिंदू समाजाचे आधारस्तंभ दैवत होते, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास परशराम गोंदकर, मीनाक्षी पाटील, भरती राक्षे, अमोल मजुकर, अमेय पाटील, रमेश पाटील, शंकर गुरखा, विनायक कुंडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व हितचिंतक उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख मजुकर व शिवसैनिकांनी खडेबाजार परिसरात मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.








