- ‘काळा दिवस’ आंदोलनात सहभागी होण्यास केला मज्जाव
कोगनोळी : बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा अडवून धरले. ‘काळा दिवस’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी बेळगावकडे येत असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते विजय देवणे आणि संजय पवार यांना निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेकपोस्टवरच थांबवण्यात आले.
कर्नाटक सरकारने कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देत महाराष्ट्रातील काही नेत्यांवर प्रवेशबंदी लागू केली असून, त्याच आदेशाच्या अंमलबजावणीत ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. मात्र, मराठी भाषिकांची वाढती एकजूट पाहून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आल्याची टीका मराठी संघटनांकडून होत आहे.

‘काळा दिवस’ निमित्त बेळगावमध्ये होणाऱ्या शांततामय मोर्चात सहभागी व्हावे आणि सीमावासीयांना नैतिक पाठिंबा द्यावा, या उद्देशाने दोन्ही नेते बेळगावकडे रवाना झाले होते. परंतु चेकपोस्टवर पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. या कारवाई विरोधातशिवसेना कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनास्थळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकार आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाहीव्यवस्थेत निवडून आलेल्या प्रतिनिधींना शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यासाठीही रोखणे हे लोकशाही मूल्यांच्या प्रतिकूल असल्याचा आरोप करण्यात आला.
मराठी संघटनांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटक प्रशासनाने कितीही कठोर भूमिका घेतली तरीही सीमाप्रश्नी न्याय मिळेपर्यंत हा लढा कमी होणार नाही. मराठी जनतेची एकजूट आणि विरोध यामुळे दडपशाहीचे प्रयत्न निष्फळ ठरतील, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.









