- शिवजयंती निमित्ताने गाडे मार्ग बिच्चू गल्ली मंडळाचा स्तुत्य उपक्रम
बेळगाव : बेळगावात काल रविवार पासून पारंपरिक शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पारंपरिक शिवजयंती निमित्त,शहापूर गाडेमार्ग बिच्चू गल्ली येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळाने शिवसंस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आणि मराठ्यांच्या गौरवशाली शौर्याचा इतिहासाला उजाळा देणाऱ्या शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाने पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ,आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन घडवून मोठ्या संख्येने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरही व्यासपीठावर उपस्थित होते. कोल्हापूर येथील श्री खंडोबा वेताळ तालीम मंडळाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या मर्दानी खेळांचा प्रारंभ लेझीम पथकाच्या निनादासह शिवरायांच्या आगमनाने झाला. त्यानंतर मर्दानी खेळ पथकातील 25 कसरतपटूंनी लाठी लाठी, लाठी कैची, सिंगल पट्टा,चौघांची कैची,शिवरायांची तलवार फेक, दोघांची तलवार लढत यामध्ये दोन तरुणींचा ही सहभाग अशा एकाहून एक चित्तधारक मर्दानी खेळांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.
मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांना शिवशाहीर मिलिंद सावंत यांच्या शिवचरित्रावर आधारित पोवाड्याच्या दमदार आवाजाची तसेच पारंपारिक वाद्यांची साथसंगत देणाऱ्या वाद्यवृंदांची सुरेल साथ लाभली. या कार्यक्रमात पथकाचे मुख्य वस्ताद आनंदराव ठोंबरे बाळासाहेब शिकलगार संगनायक किरण जाधव यांची समर्थ साथ लाभली.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही कलापथकाच्या मर्दानी खेळांचे कौतुक व्यक्त करताना, शिवजयंतीच्या निमित्ताने बिच्चू गल्ली मंडळाने आयोजित केलेल्या अनोख्या शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. अशा कार्यक्रमांचे बेळगावातील इतर मंडळांनी ही अनुकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित शिवभक्तांनी या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचा आनंद घेतला.








