बेळगाव / प्रतिनिधी

शिवबसवनगर येथील प्रसिद्ध आणि जागृत समजल्या जाणाऱ्या श्री जोतिबा मंदिरात बुधवारी चैत्र पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने सकाळपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. पहाटेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. सकाळी सहा वाजता अभिषेक, पाद्यपूजा आणि अलंकार पूजन विधी पार पडले. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सायंकाळी आठ वाजता दीपप्रज्वलनानंतर दख्खनचा राजा श्री जोतिबा माऊलीची महाआरती करण्यात आली. या वेळी उपस्थित भाविकांनी भक्तीभावाने सहभाग घेतला.

दरम्यान, चैत्रोत्सवानंतर ६ एप्रिल २०२६ रोजी सासनकाठी आगमन होणार असून, त्यानिमित्त दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. कोल्हापूर येथील जोतिबा यात्रेला जाता न आलेल्या भाविकांसाठी शिवबसवनगर येथील मंदिरात दर्शनाची सुविधा उपलब्ध होत असल्याने मोठ्या संख्येने भक्त येथे येत असतात.