बेळगाव / प्रतिनिधी
आधार एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवबसवज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांची जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे देहदानाचा संकल्प केलेल्या दोन ज्येष्ठ महिला सदस्यांचा गौरव करण्यात आला. हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.टी. बामणे होते. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. पूजा बामणे आणि उपप्राचार्य डॉ. महांतेश साणिकोप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अस्मिता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. तसेच डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. पी. जयमोहन आणि डॉ. सॅबेस्टीयन डिसोजा यांनी होमिओपॅथी शास्त्राबद्दल विशेष माहिती दिली. विद्यार्थिनी दिव्या हिनेदेखील आपले विचार मांडले. देह दानाचा संकल्प केलेल्या घरकुल वृद्धाश्रमातील ज्येष्ठ सदस्य पद्मावती भावे आणि गीता मुनवळी यांनी देहदानाचा संकल्प केला आहे. त्याबद्दल कॉलेजच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांचा परिचय डॉ. स्वप्ना चौलीगेर आणि सहना यांनी करून दिला. डॉ. मानसी चिंचणीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. श्रीदेवी यांनी केले. विद्यार्थिनी प्रतिनिधी गायत्री रेवणकर यांच्यासह इतर सदस्यांनी संयोजन केले.







