• निबंध-वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा होणार गौरव
  • डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे विशेष व्याख्यान

कागवाड : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव आणि शिवानंद महाविद्यालय, कागवाड येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शिवानंद महाविद्यालयात विशेष व्याख्यान व निबंध-वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर, सचिव सुधाकर गावडे, खजिनदार गुरुनाथ किरमटे आणि प्रा. मनोज कोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवानंद महाविद्यालयात निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धांचे परीक्षण डॉ. अमोल पाटील, पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी आणि प्रा. मनोज कोरे यांनी केले.

निबंध स्पर्धेसाठी ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : साहित्य आणि सामाजिक परिवर्तन’, ‘वाचनसंस्कृती : व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि विद्यार्थ्यांचे भविष्य’ हे विषय देण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘युवक आणि राष्ट्रनिर्माण’, ‘मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व’ आणि ‘यशासाठी शिस्त’ हे विषय ठेवण्यात आले होते.

निबंध स्पर्धेत माधुरी दीपक माने हिने प्रथम, श्रुतिका याडवाडे हिने द्वितीय तर अर्चना पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. प्रियंका इंगळे आणि योगिता माळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.

वक्तृत्व स्पर्धेत मधुरा राजू माळी हिने प्रथम, शुभम निवृत्ती बोरगावे याने द्वितीय तर सानिया गायकवाड हिने तृतीय क्रमांक मिळविला. अक्कताई खंडू पाटील, वैष्णवी सदाशिव माळी, माधुरी दीपक माने आणि संदेश संभाजी माने यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि साहित्यप्रेमींनी या विशेष व्याख्यान व बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले आहे.