• यात्रेत लाखो भाविक सहभागी : देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा  

सौंदत्ती / वार्ताहर

सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची शाकंभरी पोर्णिमा यात्रा मोठ्या भक्तीभावात संपन्न होत आहे. शाकंभरी पौर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून तब्बल पाच लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस असून, भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि “आई उदो”च्या जयघोषाने संपूर्ण डोंगर परिसर दुमदुमून गेला आहे.

भाविकांची संख्या मोठी असल्याने देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या प्रचंड गर्दीचा विचार करून श्री रेणुका देवी विकास प्राधिकरणाने भाविकांच्या सोयीसाठी व्यापक तयारी केली आहे. यात्रेच्या काळात दर्शन व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक दुडगुंटी यांनी भाविकांना शांतता व शिस्त पाळून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन केले आहे. आई उदोच्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत संपूर्ण यल्लमा डोंगर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. श्री रेणुका देवीचे दर्शन वर्षभर भाविक घेत असले तरी, जानेवारी महिन्यातील शाकंभरी पौर्णिमा यात्रेला सर्वाधिक गर्दी होत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते. पौर्णिमेच्या दिवशी लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी डोंगरावर येतात.

यात्रेदरम्यान नित्य नियमाप्रमाणे पहाटे देवीचा अभिषेक, पूजा व आरती झाल्यानंतरच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येते. त्यामुळे पूजा काळात दर्शन बंद राहिल्याने रांगेत उभ्या असलेल्या भाविकांचा काहीसा खोळंबा होत असल्याचेही दिसून आले. शाकंभरी पौर्णिमा यात्रेसाठी मंदिर प्रशासनाने भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, स्वच्छता, प्रकाशयोजना, पोलीस बंदोबस्त तसेच दर्शन व्यवस्थेवर विशेष भर दिला आहे. या सर्व उपाययोजनांमुळे यात्रा सुरक्षित व सुरळीत पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.