बेळगाव / प्रतिनिधी
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने उद्या रविवार, दिनांक ४ जानेवारी रोजी आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात मोफत निकाली कुस्त्यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या जंगी कुस्त्यांच्या उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी, समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, मराठा समाजाचे नेते किरण जाधव, भूषण काकतकर, डॉ. गणपत पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष भरत पाटील, तसेच केंपन्नावर, हाणगोजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विजयी पैलवानांसाठी बेळगाव केसरी वन तर महिला पैलवानांसाठी महिला बेळगाव केसरी वन असे विशेष पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. उद्याच्या कुस्त्यांसाठी आनंदवाडी आखाडा पूर्णपणे सज्ज झाला असून, बेळगाव आणि परिसरातील सर्व कुस्तीप्रेमींनी या मोफत जंगी कुस्त्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी केले आहे.








