बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील अनुभव वैदिक शाळेचा पहिला वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमाला केएलई इंजिनिअरिंग कॉलेजचे डी. एस. रेवणकर, एन. एस. गुंजाळ, कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक देवीप्रसाद पाटील व पत्रकार श्रीकांत काकतीकर अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी अनुभव वेदिक शाळेचे डॉक्टर विनोद यांनी उपस्थित आमचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविक विचारात वेदिक शाळेत दिल्या जाणाऱ्या ध्यानधारणा, तंत्र-मंत्र साधना, त्याचबरोबर शारीरिक व्याधींवर मात करण्यासाठी हिलिंगचे महत्व यावर माहिती दिली.

यावेळी बोलताना श्रीकांत काकतीकर म्हणाले, चिंता, नैराश्य, नकारात्मक विचार, झोपेचे विकार आणि जुनाट आजारांपासून मुक्तता मिळवण्यासाठी लोक दूरदूरून या ठिकाणी येत असतात. डॉ. विनोद हे सामाजिक बांधिलकीच्या ध्येयाने,समाज विसरलेल्या प्राचीन तंत्रांद्वारे लोकांना निरोगी जीवन जगण्याचे ज्ञान देत आहेत.अनुभव वेदिक शाळेच्या माध्यमातून अनेक गंभीर व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांवर मेराकी हिलींगच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. अनेक रुग्णांना हीलिंगचा चांगला अनुभव आला आहे.शारीरिक व्याधी विकारांवर मात करण्यासाठी हिलिंग उपचार पद्धतीचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांनी ही यावेळी डॉक्टर विनोद यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी चालविलेल्या कार्याचे कौतुक केले. वर्धापन दिनानिमित्त वैदिक होम आणि इच्छापूर्ती श्री हनुमंताचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.