• उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : येथील काव्यक्षेत्रात मागील तीन दशकांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत असलेल्या शब्दगंध कवी मंडळ संघाचा ३५वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महिला विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम तीन सत्रांमध्ये पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षी उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धा घेण्याचा निर्णय संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

पहिल्या सत्रात सर्वांसाठी खुली असलेली उत्स्फूर्त चारोळी लेखन स्पर्धा होणार आहे. चारोळी लेखन स्पर्धेसाठी ऐन वेळी विषय देण्यात येणार असून त्या विषयावर चारोळी लिहावयाची आहे. दुसऱ्या सत्रात शब्दगंधची निर्मिती असलेला ‘काव्यगंध’ हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होईल.
तर तिसऱ्या, समारोप सत्रात चारोळी लेखन स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाबाबत माहिती देताना शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी यांनी सांगितले की, “गेल्या तीन दशकांपासून काव्य आणि साहित्यप्रेमींच्या सहभागातून शब्दगंध संघाने सातत्याने साहित्यसेवेचे कार्य केले असून, यावर्षीचा वर्धापन दिन अधिक रंगतदार ठरेल,” असे ते म्हणाले.