बेळगाव / प्रतिनिधी
गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमी “सीमोल्लंघन’ कार्यक्रमासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हेस्कॉमचे बेळगाव शहर कार्यकारी अभियंता श्री. मनोहर सुतार यांची नेहरूनगर कार्यालयात भेट घेतली व येणाऱ्या दसरा उत्सवासंदर्भात चर्चा करण्यात आली.
सर्वप्रथम नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान हेस्कॉम अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या पध्दतीने नियोजन करून कुठेही अडथळा न करता सुरळीत उत्सव पार पडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ विजयादशमी दिवशी सायंकाळी ४ वाजता शेकडो वर्षाचा इतिहास असलेला बेळगावचा ऐतिहासिक दसरा सीमोल्लंघन मैदानात (मराठी विद्यानिकेतन मैदान) पार पडतो. बेळगावातील विविध देवस्थानाच्या शासनकाठी व पालख्या या दिवशी विजयादशमीचा दिवस संपन्न करण्यासाठी एकत्र मैदानात जमतात. मागील काही वर्षापासून श्री. रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली हा दसरा उत्सव शिस्तबद्ध नियोजन करण्यात आला. काही वर्षांपासून दसरा उत्सवात सुद्धा हेस्कॉम विभाग सतर्क राहून सर्व रीतीने तयारी करून सहकार्य करतात. मागील काही तीन-चार वर्षापासून कुठेही अनुचित घटना घडल्या नाहीत. यंदाच्या वर्षी सुद्धा असेच सहकार्य करण्यासाठी आणि अजून काही अडथळे असतील ते मोकळे करण्यासाठी मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी दसरा महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, मल्लेश चौगुले, विविध देवस्थानाचे पदाधिकारी लक्ष्मण किल्लेकर, मुर्गेश अंगडी, परिश्रम किल्लेकर, श्रीनाथ पवार, बळवंत, ज्योतिबा धामणेकर, मनोज काकतकर उपस्थित होते.