- ग्रामस्थांत संताप
सावगाव : बेळगाव तालुक्याच्या सावगाव गावात ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बसविलेली पाण्याची टाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी बसविण्यात आलेली ही एकमेव टाकी दोन ते तीन दिवसांपूर्वीच चोरीस गेल्याचे मंगळवार, ३ मार्च रोजी रात्री उघड झाले.
अंत्यसंस्कारावेळी पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी ही टाकी उभारण्यात आली होती. मात्र नव्याने उभारलेली सुविधा अल्पावधीतच चोरीस गेल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंची सुरक्षितता धोक्यात आल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
घटनेनंतर संबंधित यंत्रणांना माहिती देण्यात आली असून, चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन टाकी परत मिळवावी, अशी मागणी होत आहे. तसेच स्मशानभूमी परिसरात सुरक्षेची ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.








