• प्रशासनाची जय्यत तयारी

बेळगाव / प्रतिनिधी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेला यावर्षी मोठी गर्दी झाली आहे. कर्नाटक तसेच महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि केरळसह विविध राज्यांतील भाविकांचे डोंगरावर आगमन सुरू असून, सलग पाच दिवस भक्तांची प्रचंड उपस्थिती अपेक्षित आहे. यावर्षी यात्रेस तब्बल तीन लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवार दि. ४ डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस असून, त्यासाठी डोंगर परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

श्री रेणुका देवी दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी पाहायला मिळते. विशेषतः प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, नवरात्र उत्सव काळ तसेच डिसेंबर ते मार्च या कालावधीत पौर्णिमेला भरणारी यात्रा प्रसिद्ध आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला कोल्हापूर व महाराष्ट्रातील भक्तांची उपस्थिती जास्त प्रमाणात दिसून येते.

प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ४० छोट्या व ५ मोठ्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असून, विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी नेमून स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. डोंगरावरील सर्व पथदीप दुरुस्त करण्यात येऊन प्रकाशव्यवस्था सुधारण्यात आली आहे.

भाविकांना मंदिराबाहेरूनही दर्शन घेता यावे यासाठी दोन भव्य एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली आहे. स्नानकुंड, डोंगरावर चढण्याचे तीन नाके आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

वाहतुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली असून, कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात्रेदरम्यान आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सुविधा तर बैलगाड्यांसह येणाऱ्या भक्तांसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याचीही सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, दररोज पहाटे ४ ते सकाळी ६.३० आणि सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत अभिषेक-पूपार्चेसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी वेळेची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्राधिकरणाचे अधिकारी अशोक दुटगुंडी यांनी केले आहे.

भक्तीभाव आणि शिस्त राखून यात्रा पार पडावी यासाठी प्रशासन व मंदिर समितीकडून आवाहन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण पाहायला मिळत आहे.