सुळगा (हिं.) / वार्ताहर
संजीविनी फाउंडेशन आयोजित ‘उमंग – २०२५’ कार्यक्रमात साई कॉलनी, सुळगा (हिं.) येथील रहिवासी कवयित्री सौ. स्मिता बाळासाहेब पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. याचे औचित्य साधून सासू–सून ग्रुप आणि साईकॉलनी वासियांच्यावतीने शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी त्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम श्री. महादेव कलखांबकर यांच्या निवासस्थानी पार पडला.

यावेळी व्यासपीठावर ह. भ. प. श्री. गुरुनाथ कलखांबकर, सेवानिवृत्त शिक्षक साहित्यिक तथा लेखक श्री. पी. बी. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब पाटील, केडीसीसी बँक तुडिये शाखा व्यवस्थापक श्री. प्रकाश पिसाळे, उद्योजक श्री. परशराम कदम, श्री. मल्लाप्पा कदम, माजी सैनिक श्री. भरमा पाटील, ह .भ. प. श्री. अजित कलखांबकर तसेच प्राध्यापक श्री. अर्जुन कलखांबकर आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी गायत्री कलखांबकर हिने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात सौ. वनिता कदम यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे फळांची परडी व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
त्याचबरोबर सत्कारमूर्ती सौ. स्मिता पाटील यांचा फळांची परडी, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कॉलनीतील पीएच.डी. पूर्ण केलेले प्रा. अर्जुन कलखांबकर यांनाही फळांची परडी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पाटील कुटुंबियांच्यावतीने उपस्थित उद्योजक श्री. उमेश मल्लाप्पा पाटील यांनीही सौ. स्मिता पाटील यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणात स्मिता पाटील यांची समाजसेवा, कवयित्री म्हणून योगदान आणि सक्रिय कार्याचे कौतुक केले. तसेच सासू-सून ग्रुपच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर आपल्या मनोगतात सौ. स्मिता पाटील म्हणाल्या, ८४ लक्ष योनी पार करून लाभलेला “मनुष्यजन्म हा अत्यंत मौल्यवान आहे. जीवन केवळ स्वतःपुरते न जगता समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे. महिलांनी आपल्या कौशल्यांचा उपयोग करून आत्मविश्वासाने पुढे यावे. पती-पत्नी ही संसाररथाची दोन चाके आहेत, दोघांचा तोल राखला तर कुटुंब सुखी राहते.” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलनीतील ज्येष्ठ व्यक्तींसह युवावर्गाने परिश्रम घेतले. ह. भ. प. श्री. अजित कलखांबकर यांनी आपल्या विशेष शैलीत सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. प्राध्यापक अर्जुन कलखांबकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कॉलनीतील सर्व रहिवासी उपस्थित होते.