• प्रा. पी. डी. पाटील यांची उपस्थिती

बेळगाव : सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या संगीत भजन स्पर्धेचा समारोप मंगळवार दि. 19 ऑगस्ट रोजी होत आहे. बेळगाव शहर ,बेळगाव तालुका, खानापूर तालुका व चंदगड तालुक्यातील एकंदर 31 भजनी मंडळांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेत सोमवारी सायंकाळपर्यंत पंचवीस संघानी आपली कला सादर केली.

मंगळवारी दुपारी २ वाजता या स्पर्धांना प्रारंभ होणार असून त्यामध्ये श्री सिद्धेश्वर संगीत भजन मंडळ निडडल, रवळनाथ भजनी मंडळ गोल्याळी, श्री हरी संगीत कलामंच कल्लेहोळ, श्री संत तुकाराम भजनी मंडळ माणगाव, रामकृष्ण हरी भजनी मंडळ जांबोटी व श्री विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कुद्रेमानी असे एकंदर पुरुषांचे सहा संघ भाग घेणार आहेत.

त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमात प्रा.पी. डी. पाटील हे “संत साहित्य व समाज प्रबोधन” या विषयावर बोलणार आहेत. या समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा मंदिरचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब गुरव हे तर अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड हे राहणार आहेत.

महिला व पुरुष अशा दोन्ही गटातील विजेत्या भजनी मंडळाना पंधरा हजार, दहा हजार, आठ हजार, सहा हजार ,पाच हजार, चार हजार, साडेतीन हजार, तीन हजार आणि अडीच हजार अशी नऊ व उत्तेजनार्थ दोन हजार रुपयांचे एक अशी एकंदर दहा बक्षिसे दिली जाणार आहेत. याशिवाय उत्कृष्ट मृदंग, तबला, पेटी वादक व गायक यांना प्रत्येकी रुपये पंधराशे असे दोन्ही गटाला एकत्रित बक्षीस दिले जाणार आहे. सर्वांसाठी खुला प्रवेश असलेल्या या स्पर्धांना उपस्थित राहून रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • पी. डी. पाटील यांचा अल्प परिचय :

महात्मा फुले ज्यूनियर कॉलेज, महागाव येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पी.  डी. पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा दारूबंदी कृती समितीचे समन्वयक म्हणून कार्य केले असून अंधश्रद्धा निर्मूलन समिती गडहिंग्लज तालुका चे कार्याध्यक्ष आहेत. लेक वाचवा अभियानात सक्रिय सहभाग. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व इतर अनेक पुरस्काराचे मानकरी, विविध विषयावर शेकडो व्याख्याने. एक उत्कृष्ट वक्ता म्हणून सुपरीचित.