- ओल्डमॅन तयार करण्यासाठी तरुणाईसह बच्चे कंपनीची लगबग
बेळगाव / प्रतिनिधी
जुन्या वर्षाच्या आठवणी मागे टाकत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बेळगावकर सज्ज झाले आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री ओल्डमॅनची प्रतिकृती जाळून नवीन वर्षाचे स्वागत केले जाणार आहे.त्यासाठी शहरात ठिकठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे.
गल्लोगल्ली विविध आकारातील ओल्डमॅन तयार करण्यासाठी तरुणाईसह बच्चे कंपनीची धावपळ दिसून येत आहे. कॅम्प परिसरात मोठ्या व राक्षसी स्वरूपातील ओल्डमॅन उभारण्यात आले असून, विक्रीसाठीही विविध आकारांच्या प्रतिकृती उपलब्ध आहेत. मंगळवारी खरेदीसाठी लहानग्यांची विशेष गर्दी झाली होती.
हॉटेल्स परवडत नसल्याने काहींनी शिवारांमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले आहे. केक व खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स दोन दिवस आधीच देण्यात आल्याने शहरात मंगळवारपासूनच नववर्षाच्या स्वागताची लगबग वाढली आहे.
- हॉटेल्समध्ये खास ऑफर्स :
नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स व रिसॉर्ट्समध्ये विशेष पॅकेजेस जाहीर करण्यात आली आहेत. डीजे नाईटसह विविध कार्यक्रमांचे आयोजन असून, शाकाहारी पदार्थांसह बिर्याणी-थाळीवर सवलती देण्यात आल्या आहेत. शहरासह परिसरातील हॉटेल्समध्ये बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे.








