• महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे किर्लोस्कर रोडवर अभिवादन कार्यक्रम

बेळगाव / प्रतिनिधी

मराठी भाषिकांच्या न्याय हक्कांसाठी संयुक्त महाराष्ट्र सीमालढ्यात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील किर्लोस्कर रोडवर आयोजित अभिवादन कार्यक्रमात हुतात्म्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात रणजीत चव्हाण – पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या पहिल्या सीमालढ्यासह आजवरच्या संघर्षातील हुतात्म्यांच्या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्यावतीने पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख वक्ते ॲड. राजाभाऊ पाटील म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्रासाठीचा संघर्ष गेल्या सात दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. स्वातंत्र्य चळवळीपासून पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला हा लढा बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व भालकीसह संयुक्त महाराष्ट्र साकार होईपर्यंत थांबणार नाही. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, हा वाद संसदेत पाठवून तेथे निर्णय व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. तोपर्यंत हा संघर्ष सुरू ठेवत हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करूया, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह उपस्थित इतर नेत्यांनीही आपले विचार मांडले. सर्व वक्त्यांनी आपल्या भाषणातून सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला. दरवर्षीप्रमाणे १७ जानेवा हा कार्यक्रम शांततेत पार पडला असला, तरी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी म्हणून हुतात्मा चौक आणि परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

तत्पूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रामदेव गल्ली, खडेबाजार, मारुती गल्ली, अणसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे हुतात्मा चौकापर्यंत शांततेत मुक फेरी काढण्यात आली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी “संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”, “रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते.

या कार्यक्रमास मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण–पाटील, रमाकांत कोंडुसकर, मदन बामणे, माजी महापौर सरिता पाटील, नगरसेविका वैशाली भातखांडे, शिवानी पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, किरण गावडे, माजी उपमहापौर संजय शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शहरप्रमुख बंडू केरवाडकर, ॲड. अमर येळळूरकर, महेश जुवेकर, मनोहर हलगेकर, सुनील बाळेकुंद्री, सागर पाटील, किरण हुद्दार, ॲड. महेश बिर्जे, आप्पासाहेब गुरव, बापू जाधव, मदन बामणे, धनराज गवळी, शिवाजी हावळानाचे, शुभम शेळके, मोतेश बार्देसकर, सचिन केळवेकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.