बेळगाव / प्रतिनिधी

खासबाग परिसरात संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त रोहिदास महाराजांच्या पालखीचे पूजन, आरती, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली असून संपूर्ण परिसर रंगीबेरंगी रांगोळीने सजविण्यात आला होता. त्यामुळे सर्व परिसर रोहिदासमय झाला होता.

यावेळी रोहिदास महाराजांच्या प्रतिमा व छायाचित्रांचे पूजन अध्यक्ष भीमराव वाय. पवार आणि सहाय्यक आयुक्त कल्याणी वेंकटेश कांबळे तसेच संतोष हंगल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ह.भ.प. लव नार्वेकर महाराज यांच्या प्रवचन व कीर्तनाने उपस्थितांना भक्तीमय वातावरणाचा अनुभव आला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ, भजनी मंडळ, महिला मंडळ व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शेवटी मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी जयंती उत्साहात साजरी केल्याबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले.