बेळगाव / प्रतिनिधी
आरोग्य आणि गावाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर स्वच्छता हा पाया असल्याचे अधोरेखित करत बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत व बेळगाव आयकर विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.

यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत करसंकलनाबाबत माहिती दिली. स्वच्छतेचा अर्थ केवळ परिसर स्वच्छ ठेवणे एवढाच नसून, चांगले विचार, उत्तम आरोग्य व शिस्तबद्ध दिनचर्या हे देखील त्यात अभिप्रेत असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य नियोजनातून वेळेत कामे पूर्ण केल्याने जीवन अधिक सुसूत्र होते, असेही ते म्हणाले. स्वच्छतेत प्रत्येकाने सहभाग घेतला तर गाव नक्कीच स्वच्छ राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते सफाई कामगारांना स्वच्छता कीट (बकेट, झाडू, हातमोजे) वाटप करण्यात आले. यावेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी करून सदस्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.

प्रारंभी ग्रामपंचायत अध्यक्ष डॉ. वाय. एम. पाटील आणि उपाध्यक्षा सायराबानू अलिसाब हुक्केरी यांनी आयआरएस संजय शंकरराव भोजने व आयआरएस धीरज कुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य उमेश बी. चोपडे, रमेश कोलकार, कल्लाप्पा देसुरकर, कल्लाप्पा एम. पाटील, कल्लाप्पा आर. पाटील यांच्यासह आयकर विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.