सांबरा / वार्ताहर

सांबरा गावात शुक्रवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एका शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती.

माहितीनुसार, सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना तिला अचानक तीव्र विजेचा धक्का बसला. धक्का बसताच ती खाली कोसळली. तातडीने परिसरातील युवकांनी तिला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले; मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

परिनीतीच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ व आजी असा परिवार आहे. ती शाळेत हुशार, शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून परिचित होती. अभ्यासासोबतच शालेय उपक्रमांत तिचा नेहमीच उत्साहपूर्ण सहभाग असायचा. या दुर्दैवी घटनेमुळे सांबरा गावात हळहळ व्यक्त होत आहे.