- विहिरीत उडी मारून संपविले जीवन : परिसरात एकच खळबळ
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव समर्थनगर परिसरात आज बुधवार दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी एका महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, सकाळी घरातून बाहेर पडलेली महिला खूप वेळ झाला तरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, विहिरीजवळ तिच्या चप्पल दिसल्याने संशय निर्माण झाला. तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिस आणि एचईआरएफ रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. या मोहिमेत एचईआरएफ रेस्क्यू टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ, पद्मप्रसाद हुली आणि राजू यांचा सहभाग होता. तर समाजसेवक अवधूत तुडयेकर यांनी मदतकार्याला हातभार लावला.
सदर मृत महिलेची ओळख पटली असली तरी तिच्याबाबत सविस्तर माहिती अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.