बेळगाव : टिळकवाडी येथील देशमुख रोड परिसरात तोरणा संकुल कॉम्प्लेक्सजवळ गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या एका निराधार वृद्ध महिलेची समाजसेविका माधुरी जाधव यांच्या सहकार्यातून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली.
कत्ती फोटो स्टुडिओसमोरील तोरणा संकुल कॉम्प्लेक्सच्या प्रवेशदालनात शकुंतला नामक वृद्ध महिला वास्तव्यास होती. परिसरातील नागरिक तिला ‘करिष्मा’ या नावाने ओळखतात. कोणताही ठावठिकाणा नसलेली ही महिला हॉटेल आणि स्थानिकांकडून मिळेल ते अन्न घेऊन तेथेच दिवस काढत होती. मागील दोन दिवसांपूर्वी ती पडल्याने तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. वेदनेमुळे ती सतत रडत असल्याचे पाहून परिसरातील रहिवाशांनी समाजसेविका माधुरीताई जाधव-पाटील यांच्याशी संपर्क साधला.
माहिती मिळताच माधुरी जाधव यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी संबंधित वृद्धेला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराची सोय करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर पाथरवट तसेच रुग्णवाहिका चालक मंजुनाथ लमाणी यांनीही सहकार्य केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे वृद्धेला उपचार मिळू शकले. तत्परतेने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल तोरणा संकुल परिसरातील रहिवाशांनी समाजसेविका माधुरी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.








