• बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

बेळगाव / प्रतिनिधी

महात्मा गांधी आणि संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला बेळगाव जिल्हा सामाजिक परिवर्तनाची साक्ष देणारी भूमी आहे. सामाजिक न्याय, सर्वांसाठी समानता, व्यक्तीस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मूल्ये भारतीय संविधानाने देशवासियांना दिलेली मोठी देणगी आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले.

शहरातील जिल्हा स्टेडियमवर आयोजित ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. प्रजासत्ताक व्यवस्थेमुळे भारतीय नागरिकांना सार्वभौमत्व प्राप्त झाले असून, देशाच्या सर्वांगीण विकासाचा रात्रंदिवस विचार करणाऱ्या डॉ. बी.आर. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हे महान भारताच्या उभारणीसाठी दीपस्तंभ ठरले आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री जारकीहोळी यांनी राज्य सरकारच्या अन्नभाग्य, गृहज्योती, शक्ती, गृहलक्ष्मी आणि युवनिधी या पाच हमी योजना अत्यंत कमी कालावधीत वचनानुसार अंमलात आणण्यात आल्याचे सांगितले. या योजनांमुळे समाजातील सर्वसामान्य घटकांना थेट लाभ मिळत असून लोकांचे जीवनमान उंचावत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी क्षेत्राबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यात पावसाळी हंगामासाठी ४.२४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात ४.२५ लाख हेक्टर म्हणजेच शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेले सुमारे २४ हजार क्विंटल दर्जेदार बियाणे ६० हजार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वेळेवर पुरवण्यात आले आहे. तसेच पीक विमा योजना आणि हवामान आधारित पुनर्रचना पीक विमा योजनेअंतर्गत ९,२९५ शेतकऱ्यांना एकूण ९६.३६ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

२०२५–२६ या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ३,३२० हेक्टर क्षेत्रातील ३,८७० शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे नुकसान झाले असून, त्यासाठी ५२३.१५ लाख रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. साखर कारखान्यांच्या सहकार्याने ऊस क्षेत्रात एकात्मिक माती व पाणी व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक प्रकल्प राबवले जात असल्याचे ते म्हणाले.

आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, जिल्ह्यात २११ कोटी रुपयांच्या अनुदानातून विविध रुग्णालयांची कामे सुरू आहेत. अथणी येथील माता व बाल रुग्णालयाचे अद्ययावतीकरण, रामदुर्गा व सवदत्ती तालुका रुग्णालयांची उभारणी तसेच बीआयएमएस परिसरात प्रादेशिक कर्करोग केंद्राच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १५ बस युनिटमधून दररोज १,५९० बसेस धावत असून, योजनेनंतर प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. युवनिधी योजनेअंतर्गत हजारो तरुणांना थेट आर्थिक सहाय्य देण्यात आले असून उर्वरित अर्जांची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय रस्ते विकास, रेल्वे उड्डाणपूल, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत, पत्रिका भवन, महापालिकेच्या वॉर्डनिहाय मूलभूत सुविधा तसेच तलाव व उद्यानांच्या पुनरुज्जीवनाची कामे प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या सोहळ्यात केएसआरपी दुसरी बटालियन, शहर व जिल्हा सशस्त्र राखीव दल, भारत सेवा दल तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन सादर केले. कार्यक्रमास आमदार आसिफ (राजू) सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलिस अधीक्षक के.रामराजन, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.