येळ्ळूर, ता. २४ : येथील नेताजी भवन येथे समाज सारथी सेवा संघाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बळीराम देसूरकर होते. यावेळी संघाच्या ध्येय व धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते अकरा सदस्यांची कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रा. सी. एम. गोरल, उपाध्यक्षपदी दुदाप्पा बागेवाडी, सेक्रेटरीपदी बी. एन. मजुकर, उपसेक्रेटरीपदी डॉ. तानाजी पावले, खजिनदारपदी अभियंता हणमंत कुगजी यांची निवड करण्यात आली. हिशोब तपासणीसाठी निवृत्त मुख्याध्यापक गोविंद काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संपर्क अधिकारी म्हणून हणमंत पाटील, राजू पावले, प्रकाश पाटील, सूरज गोरल आणि रमेश जयराम धामणेकर यांची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी एक वर्षाच्या कालावधीसाठी निवडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

संघाच्या वतीने गावातील शैक्षणिक व सामाजिक समस्या, महिला सबलीकरण, कामगार, शेतकरी व विद्यार्थी यांच्याशी संबंधित प्रश्न तसेच गावात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेविरोधात काम करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आल्याची माहिती प्रास्ताविकात सतिश देसूरकर यांनी दिली.

निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रकाश अष्टेकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बैठकीचे सूत्रसंचालन अनिल हुंदरे यांनी केले, तर आभार संजय गोरल यांनी मानले. बैठकीस संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.