बेळगाव / प्रतिनिधी

“आचार्य अत्रे हे आभाळाएवढे मोठे साहित्यिक होते. ते साहित्य सम्राट होते .अत्रे म्हणजे चिरंतन मूल्ये जपणारा साहित्यिक काव्याचा जनक”असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी बोलताना व्यक्त केले.

येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने रविवारी आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार लक्ष्मीकांत देशमुख यांना देऊन सन्मानित करण्यात आले. वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी त्यांना हा पुरस्कार बहाल केला. पंचवीस हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

“आचार्य अत्रे यांचे भाषा समाज आणि संस्कृती बाबतचे योगदान” या विषयावर बोलताना देशमुख यांनी अत्रे यांच्या साहित्यिक सामाजिक चळवळीचा आढावा घेतला. अत्रे बंडखोर होते पण अतिशय कर्तृत्ववान व नम्रही होते त्यांनी सदगुणांची उपासना केली. असे ते म्हणाले.

प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. वाचनालयाचे उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी देशमुख यांच्या साहित्य सेवेचा परिचय करून दिला. संचालक प्रसन्न हेरेकर यांनी आभार प्रदर्शन केले तर कार्यवाह सुनिता मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.