• जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आवाहन

बेळगाव / प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केला आहे. सततच्या पावसामुळे घटप्रभा, कृष्णा, दूधगंगा, हिरण्यकेशी, मार्कंडेय आणि मलप्रभा नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे जिल्हापालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, हिडकल जलाशय पूर्णपणे भरल्यामुळे, दररोज हजारो क्युसेक पाणी वाहत आहे आणि २५,००० हून अधिक क्युसेक पाण्याचा आधीच विसर्ग करण्यात आला आहे. हिडकल डॅम, हिरण्यकेशी, मार्कंडेय आणि बळ्ळारी नाला आणि घटप्रभा नदीतून एकत्रितपणे ४०,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचा धोका आणखी गंभीर झाला आहे.

या संदर्भात, नदीपात्रात राहणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करत आहे. कृष्णा आणि हिरण्यकेशी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असलयाने, स्थलांतरित होण्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित कारवाई करावी. अनेक पूल आधीच पाण्याखाली गेले असल्याने, वाहतुक करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज पडल्यास, परिस्थिती लक्षात घेऊन उद्या देखील सुट्टी दिली जाईल. पालकांनी मुले, वृद्ध आणि महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्यावे. आवश्यक वस्तूंची आगाऊ व्यवस्था करावी आणि नदीपात्र, पूल आणि पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी जाणे काटेकोरपणे टाळावे अशी सूचना त्यांनी केली.

मी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन दलांच्या सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांची सुरक्षा ही आमचे प्राधान्य आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सर्वांना या कठीण परिस्थितीत सतर्क राहून एकमेकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे जेणेकरून स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित होईल.