बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या हक्कभंग तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी मंगळवारी नवी दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
यावेळी कडाडी यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही खासदाराचे विशेषाधिकार भंग केलेले नसून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीच त्यांनी कायदेशीर पावले उचलली आहेत. बेळगाव हा कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेला संवेदनशील जिल्हा असून येथे सर्व भाषिक नागरिक शांततेत नांदतात, असेही त्यांनी नमूद केले.
१ नोव्हेंबर ‘काळा दिन’ तसेच हिवाळी अधिवेशनाच्या काळात काही संघटना चिथावणीखोर भाषणांद्वारे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करत अशा परिस्थितीत शांतता राखणे हे जिल्हा प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे कडाडी यांनी अधोरेखित केले.
खासदार धैर्यशील माने यांना बेळगावात येण्यापासून रोखणे हा हक्कभंग नसून, तो कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेला घटनात्मक निर्णय होता. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणे चुकीचे असल्याचे मतही कडाडी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याप्रकरणी कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाणार नसून, सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती खासदार कडाडी यांनी दिली.







