• नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
  • महापालिकेकडे तातडीने कारवाईची करण्याची मागणी

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरातील रयत गल्ली परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून, रविवारी दुपारी एका १० वर्षांच्या चिमुरडीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रयत गल्लीतील रहिवासी निविका जितेंद्रसिंह राठोड हिला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सोमवारी तिला घरी सोडण्यात आले आहे.

या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू असून, वाहनांचे तसेच इतर साहित्याचे नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र, आता थेट लहान मुलांवर हल्ले सुरू झाल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे. योग्य व तत्काळ कारवाई न झाल्यास महापालिकेसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.