• अबकारी विभागाची धाड ; ३.१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बेळगाव / प्रतिनिधी

 बेळगाव तालुक्यातील रणकुंडये परिसरातील रस्त्यावरून गोवा राज्यातून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अबकारी विभागाने रविवारी धाड टाकून मोठा साठा जप्त केला.

खात्रीलायक माहितीनुसार बेळगाव विभागाच्या अबकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. सीपीआय मंजुनाथ मेल्लिगेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचून संशयित वाहन अडवले. कच्च्या मार्गाने गोवा राज्यातून दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम आखण्यात आली होती. तपासणी दरम्यान सुमारे ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात २०५ लिटर गोवा बनावटीची दारू तसेच २५ लिटर ओरॅक दारूचा समावेश आहे.

कारवाई सुरू होताच संशयित चालकाने कार घटनास्थळीच सोडून पलायन केले. संबंधित वाहन जप्त करण्यात आले असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.