बेळगाव : श्रावण मासातील विविध सण आणि उत्सवातून आंतरिक शक्ती प्राप्त होते.रक्षाबंधन हा सण केवळ भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण नसून, चांगल्या आचार विचार रक्षणाचा सण असल्याचे प्रतिपादन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शहापूर शाखेच्या ब्रह्मकुमारी राधिका बहेन यांनी बोलताना व्यक्त केले.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने आज शनिवारी सकाळी शहापूर बॅरिस्टर नागपूर चौक येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात शहापूर टपाल कार्यालयातील कर्मचारी तसेच उपस्थित पत्रकारांना ब्रह्माकुमारी यांच्या हस्ते राखी बांधण्यात आल्या. या कार्यक्रमाला शहापूर टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर एस. पी. कांबळे तसेच ब्रह्माकुमार काशिनाथ भाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ब्रह्मकुमारी राधिका बहेन म्हणाल्या, आधुनिक युगात विज्ञानाने मोठी झेप घेतली आहे. मात्र, तरीही सर्वांनाच सुख शांती मिळताना दिसत नाही.अध्यात्मिक मार्गातूनच प्रत्येकाला जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त होते. माणसाच्या जीवनात शालिनता हवी. जीवनात चारित्र्याचे महत्त्व मोठे आहे. याचे सर्वांनी भान राखावे. ईश्वरीय संदेश देण्याचे काम प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने केले जात आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. ब्रह्माकुमार काशिनाथ भाई यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कार्याचे माहिती विशद केली.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्रीकांत काकतीकर यांनी केले. उपेंद्र बाचीकर यांनी प्रास्ताविक केले.आभार प्रदर्शन हिरालाल चव्हाण यांनी केले. ब्रह्माकुमारी सुमन, ब्रह्माकुमारी प्रमिळा,ब्रह्माकुमारी शकुंतला, ब्रह्माकुमारी मंजुळा यांच्याबरोबरच सविता जौलर, संजय चौगुले, हरीश दिवटे, उमेश राऊळ अन्य सदस्य यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.