बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी बेळगाव शहरात दोन दिवस मद्यविक्रीवर बंदी लागू करण्यात आली आहे. शहराचे पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कर्नाटक अबकारी अधिनियम 1965 मधील कलम 21(1) आणि कर्नाटक पोलिस अधिनियम 1963 मधील कलम 31 अन्वये हा आदेश जारी केला आहे.

या निर्णयानुसार 31 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सर्व प्रकारची मद्यविक्री व दारू बाळगणे प्रतिबंधित राहील. या काळात वाईन शॉप, बार, क्लब, हॉटेलमधील बार, दारू दुकाने तसेच KSBC एल डेपो पूर्णतः बंद राहतील. तसेच सर्व परवाना धारक दुकाने सील करण्यात येतील.

शहरातील शांतता व सार्वजनिक शिस्त राखण्यासाठी अबकारी निरीक्षक, उपविभागीय अबकारी अधीक्षक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस आयुक्त बोरसे यांनी दिला आहे.