• विधान परिषद सदस्य नागराज यादव

बेळगाव / प्रतिनिधी

राजकीय स्वार्थासाठी कन्नड – मराठी भाषिक वाद निर्माण करू नये. सरकारने कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकच्या विकासाला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट मत विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी व्यक्त केले.

बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना त्यांनी उत्तर कर्नाटकच्या विकासाशी संबंधित विविध मुद्दे मांडले. शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये भरीव गुंतवणूक होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बेळगावचा विकास बेंगळुरूच्या धर्तीवर व्हावा, जेणेकरून मोठ्या उद्योगपतींची गुंतवणूक या भागात येईल, अशी मागणी त्यांनी केली. यासोबतच सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारणे, रिंग रोडची निर्मिती, नवीन विद्यापीठ सुरू करणे, आलमट्टी धरणाची उंची वाढवणे आणि केपीएस शाळांची संख्या वाढवणे या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला.

कर्नाटक राज्य देशाला मोठ्या प्रमाणावर जीएसटी देत असल्याने, राज्यातील विकासकामे आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे वेगाने पूर्ण केली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्राच्या विस्तारासाठी सरकारी क्षेत्रासोबत खासगी संस्थांनाही प्रोत्साहन द्यावे, असे ते म्हणाले.

बेळगावमधील कामगारांच्या समस्या, स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे आणि पिण्याच्या पाण्याची योजना लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. कर्नाटकच्या एकत्रीकरणासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र राज्याची मागणी करणे चुकीचे आहे. केवळ राजकारणासाठी भाषिक वादाला खतपाणी न घालता सर्वसमावेशक विकासावर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.