खानापूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढते स्थलांतर, बदलती सामाजिक परिस्थिती आणि इतर विविध कारणांमुळे सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने गुरुवारी मेंढेगाळी, हत्तररवाड, हलगा, मेरडा, करजगी, नागरगाळी, कृष्णनगर आदी परिसरातील सरकारी मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना आबासाहेब दळवी यांनी मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकणार आहे. मराठी शाळा केवळ शिक्षणाचे केंद्र नसून त्या आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या जतनाचे माध्यम आहेत. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला मराठी शाळेत प्रवेश देण्यास प्राधान्य द्यावे. शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांशी आत्मीयता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शाळेबद्दल आकर्षण निर्माण करावे. सीमाभागातील मराठी शाळा टिकविणे ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाचे ते राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्य आहे. गावागावातील नागरिकांनी मराठी शाळांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, शाळांमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबवावेत आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ते सर्वतोपरी प्रोत्साहन द्यावे. मराठी शाळा सक्षम झाल्यास भावी पिढीमध्ये मातृभाषेप्रती प्रेम, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होईल असे मत व्यक्त केले.
ॲड. अभिजीत सरदेसाई, राजाराम देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. मिलिंद देसाई यांनी युवा समितीतर्फे हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शैक्षणिक साहित्य वितरण झाल्यानंतर शाळा सुधारणा कमिटी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या या उपक्रमाचे स्वागत करून अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच मराठी शाळांबद्दल जनजागृती करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले.








