- बेळगाव ग्रामीण भागात मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न उघड
- परिसरात भीतीचे वातावरण
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव ग्रामीण भागात चार लहान मुलांना अज्ञात व्यक्तीने सहलीचे आमिष दाखवून दुचाकीवरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने ही मुले सुरक्षित सापडली असली तरी या प्रकारामुळे पिरनवाडी आणि येळ्ळूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, पिरनवाडी येथील ७ ते ८ वर्षे वयोगटातील चार शालेय मुले मंगळवारी दुपारी गल्लीत खेळत होती. त्यावेळी एका अनोळखी इसमाने “सहलीला घेऊन जातो” असे सांगून त्यांना दुचाकीवर बसवले. काही वेळाने त्याने मुलांना येळ्ळूर गावाजवळील निर्जन शेतात सोडून दिले आणि तेथून पसार झाला.
शेतात घाबरलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या या मुलांकडे कार्लेकर नावाच्या सतर्क शेतकऱ्याचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ ग्रामस्थ आणि पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, आपली मुले बेपत्ता झाल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून येळ्ळूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातून मुलांना ताब्यात घेतले.
मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. अज्ञात व्यक्तीचा नेमका हेतू काय होता आणि त्याने मुलांना शेतात का सोडले, याचा तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांवर सतत लक्ष ठेवावे आणि अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







