• ‘बुडा’ची तत्परता ; नाला पूर्ववत करण्याचा आदेश

बेळगाव / प्रतिनिधी

अनधिकृत ले-आऊट विरोधात बेळगाव नगरविकास प्राधिकरणने (बुडा) मोहीम सुरू केली आहे. सोमवारी (ता. ४) ‘बुडा’ने पिरनवाडी येथील अनधिकृत ले-आऊटवर कारवाई केली आहे. पिरनवाडी येथील सर्व्हे क्रमांक ११३ व ११५ मध्ये ही कारवाई झाली.

विशेष म्हणजे त्या ठिकाणी नाल्यात भराव टाकून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. नाल्यातील भराव काढून नाला पूर्ववत करण्याची सूचना ‘बुडा’ अधिकाऱ्यांनी दिली. न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. त्या ले -आऊटमध्ये भूखंड तयार करण्यासाठी दगड रोवण्यात आले होते. जेसीबीच्या सहाय्याने ते सर्व दगड उखडून टाकण्यात आले. या कारवाईच्या माध्यमातून ‘बुडा’ प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत ले-आऊट धारकांना इशारा दिला आहे. बेळगाव शहरासह बेळगाव तालुक्यातील ५५ गावे बुडा कार्यक्षेत्रात येतात. या ५५ गावांमध्ये खासगी ले-आऊट तयार करण्यासाठी ‘बुडा’ची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यासाठी ‘बुडा’कडे रीतसर अर्ज दाखल करावा लागतो. पण, ले-आऊटसाठीचा खर्च टाळण्यासाठी व जागा वाचविण्यासाठी विना परवाना ले-आऊट तयार केले जात आहेत. ‘बुडा’कडून याआधी अशा ले-आऊट्सवर कारवाई करण्यात आली आहे, तरीही पुन्हा ‘बुडा’ कार्यक्षेत्रात असे अनधिकृत ले-आऊट तयार केले जात आहेत. पिरनवाडी गाव ‘बुडा’ कार्यक्षेत्रात आहे. पिरनवाडी बेळगाव शहरालगत आहे, शिवाय पिरनवाडीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खासगी ले-आऊट तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. तेथील सर्व्हे क्रमांक ११३ व ११५ मध्ये अशाच पद्धतीने अनधिकृत ले-आऊट तयार केले जात असल्याची माहिती ‘बुडा’ प्रशासनाला मिळाली. शिवाय तेथील नाला बुजविण्यात आल्याची गंभीर बाबही निदर्शनास आली.

त्यामुळे तेथे कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी ‘बुडा’ आयुक्त शकील अहमद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. त्यात नगररचना अधिकारी बी. व्ही. हिरेमठ, कार्यकारी अभियंते एस. सी. नाईक, सहायक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री, सहायक अभियंते हनीफ अथणी, शिवकुमार आदींनी सहभाग घेतला. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली. यावेळी पोलिस कर्मचारी नामदेव सुळेभावी, श्रीधर बजंत्री व शिल्पा तळकेरी यांचा समावेश होता.

  • नाला वळविल्याचे प्रकरण गंभीर :

नाला वळविल्याचे प्रकरण आयुक्त शकील अहमद यांनी गांभीर्याने घेतले. नाला बुजविण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे नाला पूर्ववत झालाच पाहिजे, असा आदेश देण्यात आला. नाला पूर्ववत केला आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी पुन्हा पाहणीसाठी येणार असल्याचेही त्यांनी संबंधितांना सांगितले.