- उक्कड गावात धक्कादायक घटना
- वडिलांनी विष पाजल्याचा आरोप
- संशयित आरोपी फरार ; पोलिसांचा तपास सुरू
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यातील उक्कड येथे अवघ्या १५ दिवसांच्या नवजात बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात वडिलांनीच बालिकेला विष देऊन ठार मारल्याचा गंभीर आरोप पत्नी व तिच्या कुटुंबीयांनी केला असून परिसरात एकच खळबळ माजली आहे.
माहितीनुसार, संबंधित संशयित व्यक्ती आपल्या पत्नीच्या माहेरी मुलीला भेटण्यासाठी आला होता. त्याच्या परत गेल्यानंतर काही वेळातच बालिकेची तब्येत अचानक खालावली आणि तिचा मृत्यू झाला. कपाशीवर फवारणीसाठी वापरण्यात येणारे विषारी औषध मुलीला पाजल्याचा आरोप पत्नी व तिच्या आई-वडिलांनी केला आहे. मुलगी जन्माला आल्याच्या नाराजीतून हे कृत्य घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नारायण बरमनी तसेच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी काकती पोलीस पथके कार्यरत आहेत.








