बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव सदाशिवनगर येथील डॉ. बी. आर. आंबेडकर शासकीय मॅट्रिकोत्तर मुलींच्या वसतिगृहात एका नर्सिंग विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली.

सुमित्रा गोकाक (वय १९, रा. मूळ गाव – विजयपूर) असे मृत तरुणीचे नाव असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नाश्ता करून ती आपल्या खोलीत गेली. दरवाजा आतून बंद करून तिने गळफास घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने मैत्रिणींनी दरवाजा तोडून पाहिले असता ही घटना समोर आली.

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस स्थानकाचे अधिकारी तात्काळ वसतिगृहात दाखल झाले व पंचनामा करून तपास सुरू केला.

या घटनेसंदर्भात समाज कल्याण विभागाचे सह-संचालक रामनगौडा कन्नोळी म्हणाले, “सुमित्रा अवघ्या वीस दिवसांपूर्वी वसतिगृहात दाखल झाली होती. आज सकाळी ती सर्वांशी नेहमीप्रमाणे बोलली होती. त्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने मैत्रिणींना संशय आला. दरवाजा उघडल्यावर तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणीला सुरुवात केली आहे. तपासानंतरच कारण स्पष्ट होईल.”

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.