- ‘परिचारिकांचे स्मितहास्यच रुग्णासाठी औषधासमान’
बेळगाव : नर्सिंग हा केवळ व्यवसाय नसून सेवा धर्म आहे. परिचारिका मनाने श्रीमंत आणि उदार असतात. त्यांचे स्मितहास्य, धाडसी शब्द आणि प्रेमळ स्पर्श हे रुग्णासाठी अर्ध्या औषधासमान परिणामकारक ठरतात, असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
शनिवारी बेळगाव येथील बीम्स नवीन इमारतीतील सभागृहात आयोजित शासकीय नर्सिंग स्कूलच्या १०९ व्या तुकडीच्या विद्यार्थ्यांच्या ‘प्रेरणा ज्योती – २०२६’ शपथविधी सोहळ्याचे उद्घाटन व दीपप्रज्वलन करून त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, “तुम्ही निवडलेला व्यवसाय अत्यंत पवित्र आहे. चांगले शिक्षण घ्या, उत्तम काम करा आणि आयुष्यभर सेवा भाव जपा. परिचारिकांची सेवा केवळ रुग्णापुरती मर्यादित नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी असते. डॉक्टर उपचार करतात, मात्र परिचारिका रुग्णाच्या मनाला आधार देते. डॉक्टर काही मिनिटांसाठी येतात, पण परिचारिका सतत रुग्णासोबत राहून त्याला धीर देते.”
“तुम्ही घेत असलेली शपथ केवळ शब्द नसून जीवनमूल्य असले पाहिजे. तुमच्या हातात जीव आहेत, मनात करुणा आणि वागण्यात शिस्त असली पाहिजे. हे तीन गुण असतील तर तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही. तुमची सेवा ही ईश्वरसेवेपेक्षा कमी नाही,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बीम्सच्या शैक्षणिक कामगिरीचा उल्लेख करत पुढील वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळावा, तसेच देशपातळीवर रँक सुधारावा, असे उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केले. तसेच संस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमास राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. बी. एल. सुजाता राठोड, बीम्सचे अधिष्ठाता व संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी, डॉ. संजय पिरापूर, शिल्पा वली, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. इरन्ना पल्लेद, डॉ. जगदीश गनागी, उषा भंडारी, डॉ. प्रकाश कोडली यांच्यासह बीम्सचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








