• ॲडव्होकेट जनरल अनुपस्थित : पुढील सुनावणी १३ ऑगस्टला

बेळगाव / प्रतिनिधी

ॲडव्होकेट जनरल गैरहजर राहिल्याने उच्च न्यायालयातील सोमवारची नगरसेवक अपात्रता सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. १३ ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत असून सदर प्रकरणात न्यायालयाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे.

महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर बेंगळूर उच्च न्यायालयात सोमवारी अंतिम सुनावणी होणार होती. त्यानुसार तक्रारदार सुजित मुळगुंद यांचे वकील नितीन बोलबंडी उपस्थित होते. त्यांनी न्यायालयात आपले म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली. मात्र सुनावणीला ॲडव्होकेट जनरल गैरहजर राहिल्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, असे म्हणत न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. आता या प्रकरणाची १३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

यापूर्वी झालेल्या ७ जुलैच्या सुनावणीवेळी मुळगुंद यांच्यावतीने ॲड. नितीन बोलबंडी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यात याचिकाकर्त्यांनी मिळकतीचा तपशील सादर करताना खाऊ कट्टा येथील दुकान गळ्याच्या माध्यमातून मिळणारी उत्पन्न लपविलेचे नमूद केले आहे. २८ जुलै च्या सुनावणी कडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. पण या सुनावणीला ॲडव्होकेट जनरल गैरहजर राहिल्याने सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली. त्यानुसार ४ ऑगस्टला यावर अंतिम सुनावणी होईल, अशी शक्यता वर्तविली होती. पण सोमवारच्या सुनावणीला ॲडव्होकेट जनरल गैरहजर राहिल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी १३ ऑगस्टला ठेवली आहे. ही सुनावणी अंतिम असल्याचे समजते.