- मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा
बेळगाव / प्रतिनिधी
मराठा समाजात वेळेवर लग्न लागत नसल्यामुळे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांची चांगलीच पंचाईत होत आहे. लग्न समारंभासाठी तासंतास थांबावे लागत आहे. लग्न समारंभात अनेक नवीन प्रथा – परंपरा सुरू असल्याने लग्नाचे धार्मिक महत्त्वच कमी होत असल्याने मुहूर्तापेक्षा १५ मिनिटे वाट पाहावी अन्यथा मित्रपरिवार व पाहुणे मंडळींनी जेवण न करता निघून जावे अशा कडवट प्रतिक्रिया मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत व्यक्त झाल्या.
सध्या लग्न समारंभाचा माहौल असल्यामुळे सर्सास दररोज लग्ने होत आहेत.परंतु एकही लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे दिसून येत आहे. काहीजण सकाळी लग्न लावत असल्यामुळे दुपारी किती वेळ झाला तरी वराचे मित्र मंडळी कडून वरातीमध्ये नाचण्यावरच भर दिला जात आहे. ही प्रथा प्रामुख्याने केवळ मराठा समाजामध्येच रुढ होत चालली आहे.काही ठिकाणी तर वेळेत न लग्न न लागल्यामुळे पाहुण्यांची जेवण करून निघून जाणे पसंत केले. अशा नवीन कुप्रथा आता सुरू होऊ नयेत व लग्नाच्या नावाने सुरू असलेला धांगडधिंगाणा वेळेस बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने मुहूर्ता नंतर पंधरा मिनिटे वाट पाहून तिथून निघून जावे. यामुळे किमान कुटुंबीयांना आपण वेळेत लग्न लावले नाही याची जाणीव होईल अशी सूचना मध्यवर्ती समितीने केली आहे.