बेळगाव / प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून काढलेल्या मिरवणुकीच्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आज सुनावणी झाली.
महादेव पाटील यांच्यासह समितीचे शुभम शेळके, मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर व सरिता पाटील या नेत्यांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. २९ सप्टेंबर रोजी पाचव्या अतिरिक्त दिवाणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रत्येकी वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तितक्याच रकमेच्या जामिनावर त्यांना मुक्त करण्याचा निर्णय दिला. तसेच ‘पुन्हा असा प्रकार घडणार नाही’ या अटीवरच जामीन मंजूर करण्यात आला.
या प्रकरणात समिती नेत्यांच्या वतीने वकील महेश बिर्जे, बाळासाहेब कागणकर, रिचमन रिकी व वैभव कुट्रे यांनी बाजू मांडली. सुनावणीवेळी मालोजी अष्टेकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे आणि प्रकाश गडकरी उपस्थित होते.