बेळगाव / प्रतिनिधी

सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून खासदार धैर्यशील माने यांची फेरनिवड झाली आहे. यानिमित्ताने आज शुक्रवार दि. ४ जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी खासदार धैर्यशील माने यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला.

भेटीदरम्यान येणाऱ्या काळात लवकरात लवकर तज्ञ समितीची बैठक बोलावण्याबरोबरच अधिवेशनाच्या काळात सीमाप्रश्नाविषयी नक्कीच विषय मांडू, सीमाभागात आपण वैद्यकीय, शैक्षणिक व शासकीय क्षेत्रातील सेवा अधिक चांगल्या रीतीने पोहचवू. सीमाभागातील मराठी जनतेच्या तळागाळात पोचून होणारा अन्याय थांबवू. दोन दिवसांपूर्वी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी “सीमाप्रश्न हा संपलेला विषय आहे,” असे वक्तव्य करून समस्त सीमाभागातल्या मराठी जनतेचा जो अपमान केला, त्याबद्दलही खासदार धैर्यशील माने आणि रमाकांत कोंडुसकर यांच्यात चर्चा झाली. चर्चेअंती याविषयी आपण संसदेत नक्की आवाज उठवू असे आश्वासनही खासदार माने यांनी दिले.