
येळ्ळूर : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) या प्रतिष्ठित अर्धसैनिक दलामध्ये निवड झाल्याबद्दल येळ्ळूर गावातील साहिल शंकर पाटील व कु. अक्षता अनिल पाटील यांचा मेणसे फिटनेस येळ्ळूर यांच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
जिद्द, अथक परिश्रम, शिस्त आणि समर्पणाच्या बळावर या दोघांनी CRPF मध्ये प्रवेश मिळवला असून त्यांच्या या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर संपूर्ण येळ्ळूर गावाला अभिमान वाटत आहे. देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.
या सत्कारप्रसंगी मेणसे फिटनेस येळ्ळूरचे प्रमुख मयूर मेणसे, श्री. संजय बस्तवाडकर, श्री. नितीन येळगुकर, प्रफुल्ल पाटील, अनिकेत पाटील, वेदांत मसेकर तसेच मेणसे फिटनेस टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी सत्कारमूर्तींचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना मेणसे फिटनेस येळ्ळूरच्या वतीने सांगण्यात आले की, तरुणांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि देशसेवेची भावना निर्माण करण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहणार आहे. हा सत्कार सोहळा येळ्ळूर गावासाठी अभिमानाचा व प्रेरणादायी क्षण ठरला.








